
25/06/2025
नांदेड जिल्ह्यात प्राणी कल्याणासाठी एसपीसीए समिती लवकरच सक्रीय! : समिती सदस्य म्हणून प्राणी मित्रांना अर्ज करण्याचे आवाहन
प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती (District Society for Prevention of Cruelty to Animals - SPCA) चा मुख्य उद्देश म्हणजे प्राण्यांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालणे, त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी असतात, तर सचिव म्हणून जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त कार्यरत असतात.
नांदेड जिल्ह्यातही ही समिती प्रभावीपणे कार्यान्वित व्हावी, या उद्देशाने धर्मा डॉंकी सेंच्युअरी, सगरोळी या संस्थेच्या प्रतिनिधींनी नुकतीच मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेतली. या बैठकीत प्राणी कल्याणाच्या दृष्टीने धोरणात्मक उपायांची चर्चा झाली. मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांना तात्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, समितीची स्थापना करून तिच्या नियमित बैठका आणि निर्णय प्रक्रिया सुनिश्चित करण्याचा आदेश दिला आहे.
या अनुषंगाने उपायुक्त पशुसंवर्धन यांनी धर्मा डॉंकी सेंच्युअरीला जिल्हा एसपीसीए समितीवर अशासकीय सदस्य म्हणून समाविष्ट होण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात अधिकृत प्रेस नोटही जारी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती, नांदेड यावर काम करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी दि. ३० जून पर्यंत विहित नमुन्यात जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त कार्यालय, देगलूर नाका, नांदेड येथे जावून अर्ज करावा.
धर्मा डॉंकी सेंच्युअरीच्या या पुढाकारामुळे नांदेड जिल्ह्यात एक सक्षम आणि कार्यक्षम एसपीसीए समिती स्थापन होण्याची दिशा स्पष्ट झाली आहे. भविष्यात जिल्ह्यातील प्राणी हक्क संरक्षण आणि कल्याणासाठी ही समिती ठोस पावले उचलणार, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.